शाईतून धाडस करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान आवश्यक!

आव्हानांतही चमकणाऱ्या पत्रकारांचा गौरव – ‘TVJA Excellence पुरस्कार 2025’ सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Pratahkal    09-Apr-2025
Total Views |
Courage in Ink: Journalists Honored
 
महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांच्या कर्तृत्वाची दखल घेत ‘महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार 2025’ सोहळ्याचे भव्य आयोजन आज मुंबईत करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत पत्रकारांना पुरस्कार प्रदान केले आणि त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर होतो का, यावर नजर ठेवण्याचे काम माध्यमे करत असतात." ते पुढे म्हणाले, "एखादा अग्रलेख सरकारला हादरवून टाकायचा, पण काळानुरूप माध्यमांच्या स्वरूपात आणि मूल्यांत बदल झाला."
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अमेरिकेच्या 1960 च्या अध्यक्षीय निवडणुकीतील केनेडी-निक्सन डिबेटचा उल्लेख करत, माध्यमांमुळे राजकारणाचे नॅरेटीव्ह कसे बदलते, यावर भाष्य केले. त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्रकारितेच्या काळाची आठवण सांगत, त्या काळातील पत्रकारितेच्या मूल्यांवरही प्रकाश टाकला. आजच्या पत्रकारितेच्या आव्हानांबाबत बोलताना ते म्हणाले, "सत्तास्थापनेच्या काळात पत्रकार 22-22 तास उभे राहतात, गाड्यांच्या मागे धावत असतात. विशेषतः महिला पत्रकारांची भूमिका उल्लेखनीय आहे, कारण त्या घर व बाहेर दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतात." अशा कठीण परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमुळे कामाची योग्य दखल घेतली जाते, हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकारांच्या अडचणी समजून घेऊन सरकार निर्णय घेत असते, असे सांगत, पुढील काळात पत्रकारांचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या वेळी मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, अभिनेता प्रशांत दामले, TVJA अध्यक्ष उदय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.