मुंबईसह नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार

28 Jan 2025 11:49:46
mumbai airport
मुंबई: मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर सत्तडीने राज्यातील विकासकामांना वेग देण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या दिशेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. यामध्ये मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नव्याने प्रवाशांसाठी खुले होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन प्रमुख विमानतळांना मेट्रो मार्ग ८ (सीएसएमआयए ते एनएमआयए) ने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यास शासनाने तत्वतः मान्यता दिली असून या प्रकल्पाच्या सुसाध्यता अहवालाची तयारी सिडकोमार्फत केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण प्रकल्प अहवाल सिडकोने तयार करावा, असे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळांच्या आजूबाजूला प्रमुख आर्थिक केंद्रांचा विकास होत असून भविष्यात या भागात आंतरजोडणीची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच येथील रस्ते व रेल्वे जाळ्याचे सुधारणा करण्यासाठी मेट्रो मार्ग ८ हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग ८ ची लांबी बहुसंख्येने नवी मुंबई परिसरातूनच जाईल आणि तोपर्यंत नवी मुंबई विमानतळ सिडकोमार्फत विकसित होणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून शासनाच्या मंजुरीसाठी संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देशही सिडकोला देण्यात आले आहेत. या मेट्रो मागांमुळे मुंबई महानगर क्षेत्राच्या कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होईल आणि भविष्यात प्रवाशांच्या प्रवासाची सोय अधिक सुलभ होईल असे मानले जाते.
Powered By Sangraha 9.0