महाकुंभमेळ्यात पहिल्या दिवशी तब्बल १.५ कोटी लोकांनी केले महास्नान

14 Jan 2025 14:48:37
mahakumbh
प्रयागराज, भक्तीचे महापर्व महाकुंभाची सुरूवात आजपासून प्रयागराजमध्ये झाली. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सकाळपासून भक्तगण गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमामध्ये अमृतस्नान घेत होते. आज अपेक्षा होती की साधारण एक कोटीच्या जवळपास भक्तगण येथे स्थान कतील. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी द्वीटमध्ये माहिती दिली की, आज तब्बल दीड कोटी लोकांनी त्रिवेणी संगमामध्ये स्नानाचे पुण्य लाभ मिळवले आहे. १४४ वर्षांनी दुर्मिळ संयोग जुळून आलेल्या व जगातील सर्वांत मोठा मेळावा असलेल्या महाकुंभ २०२५ ची सुरुवात प्रयागराजमध्ये पहिल्या स्नानाने झाली. या अमृतमय महाकुंभात देश आणि विदेशातील ४५ कोटींहून अधिक भाविक, साधू, संत 'श्रद्धेचे डुबकी' घेतील, असे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभसाठी हजारो साधू-संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पुढील दीड महिन्यांत तब्बल ४० कोटी भाविक या मेळ्याला येतील, अशी शक्यता गृहीत धरूनच उत्तर प्रदेश सरकारने या सोहळ्याची तयारी केली आहे. श्रद्धा, व्यापार व आधुनिक व्यवस्थापन यांचा मिलाफ असलेल्या या महाकुंभामागे एक प्रचंड आर्थिक यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर आर्थिक प्रगतीस चालना देत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने महाकुंभसाठी ६,९९० कोटी रुपये खर्च करून ५४९ प्रकल्प सुरू केले आहेत. या अंतर्गत विकासापासून स्वच्छतेपर्यंतची अनेक कामे चालू आहेत. २०१९ मधील कुंभमेळ्याशी तुलना केल्यास त्यावेळी ३,७०० कोटी रुपये खर्च करून ७०० प्रकल्प हाती घेण्यात आले होते. शाही स्नानासाठी प्रशासनाने १०.५ किमी लांबीचा घाट तयार केला असून आखाड्यातील प्रवेशासाठी दोन विशेष रस्ते तयार करण्यात आले आहेत. नागा साधूंसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीसाठी विशेष मार्ग तयार करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0