मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : मागील पंधरा दिवसापासून घमासान सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. त्यापूर्वी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात आले. यावेळी निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचार करताना हायटेक प्रचार यंत्रणेचा उपयोग केला गेला. विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा मागील पंधरा दिवसापासून सुरू होता. वेगवेगळ्या मार्गाने उमेदवार प्रचार करत होते. यावेळी निवडणुकीमध्ये तीन पक्षांची मिळून महायुती आणि महाविकास आघाडी झालेली आहे.
त्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना चांगलीच दमछाक झाल्याचे देखील दिसून आले. यावेळी उमेदवारांनी आपला पारंपारिक पद्धतीने म्हणजे पत्रक वाटणे, मतदारांच्या भेटी गाठी घेणे, वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांना भेटणे, असा प्रचार करतानाच काहीसा हायटेक यंत्रणेचा देखील उपयोग करून घेतला जसे की चित्ररथ तयार करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसमोर जाण्याचा प्रयत्न असणे, वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी तयार करून आपल्या पक्षाची आणि चिन्हाची निशाणी ही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जवळपास यावेळी सर्वच पक्षांचा प्रचार हा हायटेकच झाल्याचे दिसून येत होते.