Monday, 17 February, 2025

३ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी घेतला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचा लाभ

Pratahkal    06-Feb-2023
Total Views |
 
Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Aapla Dawakhana
 
मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) सुरु केलेल्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) उपक्रमातील लाभार्थी संख्येने ३ लाखांचा टप्पा आज (दिनांक ४ फेब्रुवारी २०२३) ओलांडला आहे. मुंबईत आजघडीला या योजनेतंर्गत १०६ ठिकाणी दवाखाने कार्यरत आहेत. लाभार्थ्यांचा वाढता पाहता या योजनेला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे.
 
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. या योजनेचा सातत्याने विस्तार करण्यात येत असून सध्या १०६ ठिकाणी आपला दवाखाने कार्यरत आहेत. दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १ लाख तर दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी २ लाख लाभार्थ्यांचा आकडा गाठण्यात आला होता. आज ३ लाख लाभार्थ्यांची संख्या पूर्ण झाली आहे. आपला दवाखान्यांमधून आतापर्यंत ३ लाख ०१ हजार ०७५ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी दवाखान्यांमधून २ लाख ८८ हजार ०२० रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १३ हजार ०५५ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.
 
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपले दवाखाने हे प्रामुख्याने सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीदरम्यान कार्यरत आहेत. या दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉ फ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.