मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) : शंभर कोटींच्या कोटींच्या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज जामिनावर सुटका झाली. सुमारे १४ महिन्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. देशमुख यांचे जल्लोषात स्वागत केले. संध्याकाळी पाच वाजता अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. त्यांना १ वर्ष १ महिना आणि २७ दिवस तुरुंगात रहावे लागले.
स्वागतासाठी देशमुख यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही आले होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. अनिल देशमुख बाहेर येणार, हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अनिल देशमुख कारागृहाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भाऊ आगे बडो, हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा दिल्या.